गुणवत्तेच्या जोरावरच संस्था आदर्श निर्माण करेल: अध्यक्षीय भाषणात शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांचे प्रतिपादन...
मलकापूर (प्रतिनिधी):
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,मलकापूर आयोजित 'आदर्श विद्यालय पुरस्कार सोहळा २०२६' अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात (भाऊ) हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण सर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिक्षकी पेशाच्या मूल्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "शिक्षकांना विद्यार्थ्यांची 'बॉडी लँग्वेज' आणि त्यांचे डोळे वाचता आले पाहिजेत. जोपर्यंत शिक्षकाचे मन स्थिर होत नाही, तोपर्यंत तो उत्तम शिक्षक बनू शकत नाही. आपल्या कामात निरंतर सुधारणा व्हावी यासाठी मूल्यमापन करणारी यंत्रणा (पथक पर्यवेक्षण) अत्यंत गरजेची आहे. शिक्षकांनी सतत नवनवीन ज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि वाढत्या स्पर्धेसाठी सर्वंकष तयारी केली पाहिजे." विद्यार्थ्यांचे डोळे आणि बॉडी लँग्वेज वाचता येणे हेच उत्तम शिक्षकाचे लक्षण आहे असे सांगत त्यांनी पुढील पथक पर्यवेक्षणासाठी सर्व शाळांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात मा.मुल्ला सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खालील शाळांना 'आदर्श विद्यालय पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले:
आदर्श विद्यालय पुरस्कार विजेत्या शाळा
शिशु गट: प्रथम क्रमांक – आदर्श शिशुविहार, मलकापूर
पूर्वप्राथमिक गट (इ. १ ली ते ४ थी): प्रथम क्रमांक – स्टार इंग्लिश मिडियम, मलकापूर
प्राथमिक गट (इ. ५ वी ते ७ वी): प्रथम क्रमांक – आदर्श प्राथमिक विद्यालय, आगाशिवनगर
माध्यमिक गट (इ. ८ वी ते १० वी): प्रथम क्रमांक – ना. आनंदराव चव्हाण विद्यालय, पोतले
उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी व १२ वी): प्रथम क्रमांक – आदर्श जुनिअर कॉलेज, मलकापूर
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व संस्था पथक पर्यवेक्षण प्रमुख मा. शरदराव चव्हाण सर यांनी विद्यालयांना दिले जाणारे हे पुरस्कार कोणत्या निकषांच्या आधारावर ठरवले जातात आणि त्यासाठी गुणदान कशा पद्धतीने केले जाते, याचे सविस्तर विश्लेषण उपस्थितांसमोर मांडले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मा. यादव सर यांनी सर्व विजेत्या शाळांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात 'आदर्श शिक्षक' व 'आदर्श लेखनिक' यांच्यासाठीही स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात यावेत, अशी महत्त्वपूर्ण सूचना मांडली.
तसेच पथक पर्यवेक्षण सदस्य डॉ. सी. बी. कुंभार सर यांनी विद्यालयांनी आपली शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता वाढवून संस्थेत एक नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या सोहळ्यास श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. वसंतराव चव्हाण गुरुजी, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के, संचालक मा. पवन पाटील सर,माजी पथक पर्यवेक्षण प्रमुख आर. ए. कुंभार सर व पथक पर्यवेक्षण सर्व सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके व सूत्रबद्ध सूत्रसंचालन सौ. सुरेखा खंडागळे मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी मानले.
संस्थेच्या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा